रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा या उद्देशाने आधार ही योजना सुरू करण्यात आली असून संपूर्ण देशामध्ये या ओळखक्रमांकामुळे प्रत्येक नागरिकास ओळखले जाईल असे `आधार` प्रकल्पाचे क्षेत्रिय उपमहासंचालक डॉ.अजय भूषण पांडे यांनी महान्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : `आधार` क्रमांक म्हणजे काय ?
उत्तर : आपल्या भारतामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांना रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा, ही त्यामागची संकल्पना आहे. जेव्हा एखाद्या माणसाला रेशन कार्ड पाहिजे असते तेव्हा त्याला पुरावा द्यावा लागतो. ओळखीचे प्रमाणपत्र द्यावे लागते. आपण शहरातील लोक पॅनकार्ड, पारपत्र, ओळखपत्र, स्वत:च्या ओळखीसाठी देतो. परंतु गावातील लोकांकडे ही कागदपत्रे नसतात. त्यामुळे त्यांना हे फायदे घेतांना फार त्रास होतो. इलेक्ट्रीक बिल घेतांना रेशनकार्डाचा पुरावा तर रेशनकार्ड घेतांना दुसरा एखादा पुरावा मागतात. एका पुराव्यासाठी दुसरा, तर दुसर्या पुराव्यासाठी तिसरा याप्रमाणे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे देशातील सामान्य लोकांचे हाल होतात. हे खर्चिक आहे. आधी वयाचा पुरावा, बँकेत खाते उघडताना पुरावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांकडे एक ओळखक्रमांक असावा ज्यामुळे त्यांना संपूर्ण देशामध्ये त्या ओळखक्रमांकामुळे ओळखले जाईल अशी योजना आहे. अभिमानाची गोष्ट आहे की, संपूर्ण जगामध्ये या मोठय़ा प्रकारची योजना मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आली आहे. म्हणजे एक `क्रांतीकारक पाऊल` म्हणावे लागेल. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लोक, झोपडपट्टीत राहणारे लोक, कुठल्याही प्रकारचे पुरावे नसलेल्या लोकांना ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
प्रश्न : नोंदणी कशी करावी, प्रक्रीया काय आहे?
उत्तर : प्रत्येक गावात, प्रत्येक शहरी भागात ठिकठिकाणी घरोघरी जाऊन लोकांची माहिती म्हणजे नाव, गाव, पत्ता गोळा करण्यात येणार आहे. याशिवाय इतर माहिती म्हणजे रेशनकार्ड व इतर कागदपत्रे याचा पुरावा म्हणून (आयडेंटिटी) घेणार आहेत. ही सर्व माहिती संगणकामध्ये डाटाबेस करुन ठराविक दिवशी त्या व्यक्तिचे दहा बोटांचे फिंगरप्रिंट्स व डोळ्यातील आयरीसचा फोटो काढला जाईल. हे केल्यानंतर त्याला एक विशिष्ट बारा क्रमांकाचा `आधार क्रमांक` दिला जाईल.
प्रश्न : आधार प्रकल्प संपूर्ण देशात लागू होणार आहे का ? याचा उपयोग व महत्त्व काय आहे ?
उत्तर : संपूर्ण देशात आधार प्रकल्प लागू होणार आहे. संपूर्ण देशामध्ये आपला एक विशिष्ट क्रमांक राहील. आपण जर नंदुरबार जिल्ह्याचे रहिवाशी असू व दिल्लीला जाऊन आपल्याला बँक खाते उघडायचे असले तर आपण आपला `आधार क्रमांक` सांगितल्यावर आपली पूर्ण माहिती व आपली ओळख त्यांना प्राप्त होईल. तो सर्व भारतामध्ये वैध राहणार आहे. एकदा `आधार क्रमांक` मिळाल्यावर वेगळा पुरावा द्यावा लागणार नाही.
प्रश्न : `आधार क्रमांक` कसा मिळेल ?
उत्तर : `आधार क्रमांक` मिळविण्यासाठी नागरिकाला शासकीय प्रमाणीत २९ दाखल्यांपैकी किमान एक दाखला आपले ओळखपत्र, वास्तव्याचा दाखला, आधार केंद्रावर दाखवावा लागेल. तो नसेल तर त्या क्षेत्रातील निबंधकांनी नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचार्यांकडून ओळखपत्र शिफारस घ्यावी लागेल. आधार केंद्रात आलेल्या व्यक्तीचा फोटो काढून त्या अर्जात इत्यंभूत माहिती भरल्यानंतर बायोमेट्रीक पद्धतीने दोन्ही हाताचे ठसे घेऊन त्या व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॉनिंग करण्यात येईल. ही सर्व माहिती ऑनलाईन साठवून त्याआधारे संगणकाने निवडलेला एक १२ अंकी क्रमांक नागरिकांना देण्यात येईल. हा क्रमांक नागरिकांना पोष्टाने पाठविण्यात येईल. महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवाची बाब म्हणजे देशभरात राबविण्यात येणार्या आधाराची सुरुवात मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंभी या छोटय़ाशा गावातून झाला आहे.
प्रश्न : पॅनकार्ड, रेशनकार्ड असल्यास आधार क्रमांकाची गरज आहे का ?
उत्तर : आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांच्याकडे ओळख पटविण्यासाठी काहीच नसते. आपल्याकडे जे रेशनकार्ड आहे ते खरे आहे का हे पटविण्यासाठी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आधार क्रमांकामध्ये सर्व माहिती असल्यामुळे (फिंगरप्रिंट, आयरीश स्कॅन ) ही व्यक्ती तीच आहे हे कळते म्हणून आधार क्रमांकाची गरज आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visit Us